हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतीची मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे (Monsoon Update) जोरात सुरु आहेत. अशातच शेतकरी मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या असून, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच मॉन्सून भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. “येत्या 48 तासांत मॉन्सून अंदमान-निकोबार तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल (Monsoon Update) होईल,” असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.
वेळेपूर्वीच दाखल होणार मान्सून? (Monsoon Update 2024)
वायव्य बंगालच्या उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी या कमी दाबाचे रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होऊ शकते. या स्थितीची तीव्रता कायम राहिल्यास केरळमध्ये वेळेपूर्वीच मॉन्सून दाखल (Monsoon Update) होईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. अर्थात पुढील दोन दिवस मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती असल्यामुळे, येत्या 48 तासांत मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे, तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होईल. असे हवामान विभागाने म्हटले आहे.
अवकाळी पावसाचे वातावरण कायम
असे असतानाच राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम देखील वाढणार असून, येत्या शुक्रवारपर्यंत (24 मे) अनेक भागात तुफान पाऊस कोसळणार आहे. असा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या 24 मेपर्यंत नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
दोन दिवस ‘या’ जिल्ह्यांना इशारा
तर जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट असणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यात उकाडा कायम असून, मागील 24 तासांमध्ये धुळे आणि जळगाव येथे राज्यातील उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात धुळे 42, जळगाव 42, अकोला 40.2, यवतमाळ 40 या ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे.