हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सर्वच शेतकऱ्यांना मॉन्सूनच्या पावसाचे (Monsoon Update) वेध लागले आहेत. परिणामी, राज्यात सर्वदूर सध्या शेतीची मशागतीची कामे उरकताना दिसून येत आहे. अशातच आता यंदाच्या मॉन्सूनच्या पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. विदर्भातील जवळपास 350 वर्षांपासूनची जुनी परंपरा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी होय. भारतीय हवामानशास्र विभागाच्या (आयएमडी) यंदाच्या वर्षीच्या चांगल्या पावसाच्या अंदाजानंतर आता भेंडवळची घटमांडणीमध्ये देखील यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडणार (Monsoon Update) असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.
कसा असेल यावर्षी पाऊस? (Monsoon Update Today 11 May 2024 Maharashtra)
अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर गट मांडणी केल्यानंतर आज (ता.११) सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला. मात्र, यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्या कारणाने कोणतेही राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आले नाही. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अंबाडी हे कुलदैवत असून, यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडणार (Monsoon Update) आहे. यात प्रामुख्याने पहिला महिना (जून) कमी पाऊस तर बरसणार असून, दुसऱ्या महिन्यात (जुलै) सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तिसरा महिना (ऑगस्ट) जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे. तर चौथ्या महिन्यात (सप्टेंबर) अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान राहणार असल्याचे भेंडवळची घटमांडणीच्या भाकितात सांगण्यात आले आहे.
कसे असेल यंदा पीकपाणी?
दरम्यान, यंदाच्या वर्षी कपाशी पिक हे सर्वसाधारण राहणार असल्याचे भाकित भेंडवळची घटमांडणी दरम्यान करण्यात आले आहे. ज्वारी सर्वसाधारण राहणार असल्याचे भाकित सांगण्यात आले आहे. तूर पीक सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचे सांगण्यात आले आहे. मूग आणि उडीद पीक देखील सर्वसाधारण असणार आहे. यंदा तीळ पिकाचे चांगले उत्पादन मिळणार आहे. बाजरी पीक सर्वसाधारण असेल तर साळीचे पीक चांगले येईल. जवस सर्वसाधारण पीक येईल तर वाटाणा पीक देखील सर्वसाधारण असणार आहे. याउलट गहू पीक यंदा भरपूर प्रमाणात मिळणार आहे. हरभरा पीक देखील यंदा चांगले येणार आहे. मात्र त्यास भावाबाबत अनिश्चितता असणार आहे. असे भाकीतही पीक पाण्याबाबत करण्यात आले आहे.