हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यातल्या काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भासारख्या भागांमध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पाऊस तर काही ठिकाणी कमालीची उष्णता असे हवामान पहायला मिळत आहे.
मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या निवळली आहे. तर पश्चिम विदर्भ पासून मराठवाडा कर्नाटक तमिळनाडू पर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्यामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांचे जवळ समुद्र सपाटीपासून 1.5 किलो मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून आज दिनांक 26 मार्च रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात पारा चाळीशी अंशांच्या वर
विदर्भात मात्र उष्णतेत वाढ झाली असून कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला आहे. शुक्रवार दिनांक 25 रोजी च्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी 42.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर आज देखील या भागात उन्हाचा चटका जाणवणार आहे. तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
देशातील कमाल तापमान
दिनांक 25 मार्च रोजी नोंदवलेले कमाल तापमान पुढील प्रमाणे पुणे 38.8, नगर 41.5, धुळे 39, जळगाव 40.2, कोल्हापूर 34, महाबळेश्वर 28.8, नाशिक 37.2, सांगली 36.4, निफाड 36.8, रत्नागिरी 32.5, यवतमाळ 39.5, वर्धा 39, नागपूर 38.2, गोंदिया 38.4, ब्रम्हपुरी 40 अंश सेल्सिअस, बुलढाणा 39, अमरावती 41.2, अकोला 42, परभणी 39, नांदेड 39, औरंगाबाद 38.4, रत्नागिरी 32.5.