Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मारा सुरूच; आणखी चार दिवस बरसणार!

Weather Update Today 15 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण (Weather Update) कायम असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वाऱ्यासह झालेल्या पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील पासून सुरूच असून, पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (Weather Update) (आयएमडी) म्हटले आहे.

जोरदार वारे वाहण्याची शक्यता (Weather Update Today 15 May 2024)

राज्यात प्रामुख्याने विदर्भाचा काही भाग आणि कोकणातील निवडक भाग वगळता, संपूर्ण राज्यभरात पुढील चार दिवस वादळी वारे आणि पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तर कुठे आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपातील पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये वादळ येण्याची शक्यता असून, या दरम्यान संबंधित भागांमध्ये ताशी 40-50 किमी इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

भारतीय हवामानशास्र विभागाच्या माहितीनुसार, आज (ता.15) अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, वाशीम, यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याउलट राज्यात सध्या अवकाळीची हजेरी पाहायला मिळत असतानाच, राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. ज्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

कमाल तापमानात घट, उकाडा कायम

दरम्यान, मागील 24 तासांमध्ये राज्यात जळगाव या ठिकाणी उच्चांकी 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सध्या राज्यात धुळे 40.0, जळगाव 41.6, वाशीम 40.0 ही काही निवडक ठिकाणे वगळता राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा 40 अंशांच्या खाली असल्याचे आढळून आले आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी उकाडा कायम आहे. ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, काही भागांमध्ये झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा आल्हाददायक गारवा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.