हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भाच्या पूर्व भागात विस्कळीत वाऱ्यांची स्थिती (Weather Update) सक्रीय आहे. ज्यामुळे आज (ता.29) पूर्व विदर्भ आणि खानदेशात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 प्रतितास राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर आता ओसरला असून, पुढील तीन ते चार दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असेही भारतीय हवामान विभागाने (Weather Update) आपल्या अंदाजात म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update Today 29 April 2024)
आज प्रामुख्याने कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाण्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Weather Update) कायम असून, तापमान चढे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर,भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अहमदनगर नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेडमध्येही हलक्या सरींची शक्यता आहे.
अनेक भागांत चाळीशी पार
दरम्यान, मागील 24 तासांमध्ये वाशीम येथे राज्यातील उच्चांकी 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमानात वाढ झाल्याने चंद्रपूर, नांदेड, मालेगाव, सोलापूर, गडचिरोली येथे पारा 42 अंशांवर पोहचला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळिशी पार आहे. धुळे 40.0, जळगाव 41.5, नाशिक 40.1, सांगली 40.5, बीड 41.2, धाराशिव 41.8, परभणी 41.5, अकोला 41.4, अमरावती 40.0, वर्धा 41.4, यवतमाळ 41.7 या भागांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांहून अधिक आहे.
‘या’ राज्यांमध्येही पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. दक्षिण भारतीय भागात या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीने आपले हात पसरले आहेत. या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये देखील गडगडाटी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.