हॅलो कृषी ऑनलाईन : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून 21 मे 2024 पासून कांदा बियाणे (Onion Seeds) विक्रीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने विद्यापीठाकडून विकसित खरीप कांद्याच्या ‘फुले समर्थ’ व ‘फुले बसवंत- 780’ या वाणांची विक्री केली जाणार आहे. कांदा बियाण्यांची ही विक्री विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून (Onion Seeds) देण्यात आली आहे.
‘या’ ठिकाणी मिळणार बियाणे (Onion Seeds For Farmers)
राहुरी विद्यापीठाने विकसित केलेल्या कांद्याच्या ‘फुले समर्थ’ व ‘फुले बसवंत-780’ या वाणांना शेतकऱ्यांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक असलेल्या नाशिक, अहमदनगर व सातारा जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, निफाड, कांदा, लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषी संशोधन केंद्र, चास, जि. अहमदनगर, कृषी संशोधन केंद्र, बोरगाव, जि. सातारा, कृषी महाविद्यालय, मालेगाव जि. नाशिक, कृषी संशोधन केंद्र लखमापूर, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषी महाविद्यालय पुणे व कृषी महाविद्यालय हाळगाव, ता. जामखेड या ठिकाणी या वाणांची विक्री सुरु करण्यात येणार आहे.
फुले समर्थ वाणाची वैशिष्ट्ये
फुले समर्थ हा वाण स्थानिक वाणातून विकसित केला आहे. हा वाण खरीप व रांगडा हंगामासाठी योग्य असून, कांदे चकचकीत गर्द लाल रंगाचे व उबट गोल असतात. कांद्याची नैसर्गिकपणे पात पडते. कांदा 86 ते 90 दिवसांत काढणीस तयार होतो, त्यामुळे दोन ते तीन पाणी पाळ्यांची बचत होते. खरीप हंगामात या वाणापासून 280 क्विंटल प्रति हेक्टर तर रांगड्या हंगामात 400 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पादन मिळते.
फुले बसवंत वाणाची वैशिष्ट्ये
हा वाण पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने स्थानिक वाणातून विकसित केला आहे. हा वाण खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे. कांदे आकाराने मध्यम ते मोठे व शेंड्याकडे थोडे निमुळते असतात. रंग गडद लाल असून हा वाण काढणीनंतर तीन ते चार महिने साठवणुकीत टिकून राहतो. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटलपर्यंत मिळते.