Weather Update : बुलडाण्यात वादळी पावसामुळे टोलनाका उडाला; प.बंगालमध्ये ‘रेमल’ चक्रीवादळाचा कहर!

Weather Update Today 27 May 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात रविवारी (ता.26) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Weather Update) झाला आहे. बुलढाणा, शेगाव, जळगाव, जामोद आणि मलकापूर शहरात विजांच्या कडकडाट आणि तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला आहे. वादळी वाऱ्यामुळे मलकापूर, सोलापूर महामार्गावर दाताळा नजिक असलेला टोलनाका अक्षरशः उडून गेला आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याशिवाय वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहे. अनेक ठिकाणी झाडे विद्युत तारांवर पडल्याने (Weather Update) तारा तुटल्या आहेत. ज्यामुळे अनेक भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान, रविवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात देखील वादळी वाऱ्यांसह जोरदार अवकाळी पाऊस (Weather Update) झाला आहे. या पावसामुळे आंबा पाणी गावाजवळील थोर पाणी परिसरात एक घर कोसळले. या घटनेत घरात झोपलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, लहान मुलगी आणि वृद्ध महिलेचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेतून 4 वर्षांचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे.

उष्णतेच्या लाटेचा इशारा (Weather Update Today 27 May 2024)

दरम्यान, राज्यातील सहा जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी उष्णतेची लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक राहणार असून, देशाच्या उत्तरेकडी राज्यांमध्ये झालेल्या तापमानवाढीमुळे राज्यात हे परिणाम दिसून येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, धुळे, जळगावात पुढील तीन दिवस तर, अकोल्यात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वांमध्ये अद्यापही कुठे मान्सूची चिन्हे नसून, मान्सून आता थेट जूनमध्येच बरसणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, त्याआधी पुढील काही दिवस कोकणचा दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पूर्वेकडील राज्यांना रेमल चक्रीवादळाचा फटका

दरम्यान, मागील काही दिवसांपासून चर्चा असलेल्या रेमल चक्रीवादळामुळे अनेक राज्यांना फटका सहन करावा लागत आहे. पश्चिम बंगालमधील अनेक शहरांमध्ये सतत पाऊस सुरू आहे. रेमल चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकले असून, आणखी काही काळपर्यंत ते उत्तरेच्या दिशेने आणि त्यानंतर उत्तर-पूर्वेच्या दिशेने सरकत कमकुवत होईल. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रेमल चक्रीवादळामुळे पूर्वेकडील विविध राज्यात आपात्कालिन प्रतिबंधक विभागासह, सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.