हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आलेला असतानाच राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचे वातावरण (Weather Update) कायम आहे. याउलट राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेचा कहर तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आजपासून पुढील चार दिवस राज्यात मुंबई, कोकणासह विदर्भात पावसाची शक्यता कायम असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. त्यामुळे आता मॉन्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना, राज्यात अवकाळी पाऊस (Weather Update) काही पाठ सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसणार (Weather Update Today 29 May 2024)
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, आजपासून (29 मे) ते 1 जूनपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता (Weather Update) आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यत आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातह पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील पूर्व भागात अर्थात विदर्भात देखील पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेच्या इशारा
हवामान विभागाने आज अकोला जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेच्या यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यालाही 29 आणि 30 मे साठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याउलट देशात प्रामुख्याने पश्चिम राजस्थान, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पूर्व राजस्थानचे अनेक भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
भंडारा, गोंदियाला झोडपले
दरम्यान, मंगळवारी (ता.28) सायंकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर, नाकाडोंगरी, आष्टी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यावेळी जोरदार वादळामुळे बऱ्याच भागांमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता. याशिवाय शेजारील जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्येही मंगळवारी सायंकाळी (ता.29) वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.