हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळतो आहे. जानेवारी महिन्याच्या ४ तारखेपासून कापसाला प्रति क्विंटल दहा हजारांचा भाव मिळायला सुरुवात झाली. आणि आता बघता बघता कापसाला ११ हजारांचा भाव मिळाला आहे. कापसाच्या उत्पादनातील घट आणि मागणीत झालेली वाढ ही कापसाच्या दरवाढीची मुख्य कारणे आहेत. काही का असेना मात्र मोठ्या कष्टाने जगवलेल्या कापसाला चांगला भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरवातीपासूनच कापसाला चांगला दर मिळतो आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजर समितीमध्ये कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदाच्या खरिपात अतिवृष्टी आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून मोठ्या कष्टाने कापसाचे पीक जगवले. त्याचे फलित म्हणून शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो आहे. यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5775 तर लांब धाग्याला 6100 एवढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे जवळपास 5 हजार अधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.