Loksabha Election 2024 : शेतकऱ्यांचा रोष… गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून केले मतदान!

Loksabha Election 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात आज लोकसभेसाठी पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (Loksabha Election 2024) होत आहे. यामध्ये कांदा पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्येही मतदान पार पडत आहे. मात्र, आज नाशिक जिल्ह्यातील मतदानादरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष स्पष्ट दिसून येत आहे. परिणामी, सध्या नाशिक जिल्ह्यात मतदान केंद्रांवर कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचा मतदानावर देखील परिणाम दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी चक्क आपल्या गळ्यात कांदे आणि टोमॅटोच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे कांदा प्रश्नासंबंधीच्या या घटनेने मतदान केंद्रावर (Loksabha Election 2024) लक्ष वेधून घेतले आहे.

तरुण शेतकऱ्यांची घोषणाबाजी (Loksabha Election 2024)

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू या ठिकाणी युवा शेतकरी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणावर रोष व्यक्त करताना दिसून आले. ते आपल्या गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रावर (Loksabha Election 2024) आले. पण त्यांना पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवले आणि कांद्याच्या माळा काढून मतदान करण्यास सांगितले. “ज्यांनी केली निर्यात बंदी, त्याला नाही सत्तेची संधी,” अशा घोषणाही या तरुण शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या आहेत. या प्रकारामुळे वडगाव इथे मोठा जनसमुदाय गोळा झाला होता पण पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणले.

भुजबळांची प्रतिक्रिया समोर

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर जिल्ह्यातील नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ यांनी म्हटले आहे की, “मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेल्याने मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाहीत. त्यामुळे मतदान करा, कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असे करू नका” कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा. राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा, असे आवाहनही यावेळी भुजबळ यांनी संबंधित शेतकऱ्यांना केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष असल्याने, सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी आपली जागा राखणे. थोडे अवघडच जाणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.