हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे तेलबिया पीक (Soybean Variety) बनले असून, पिकाखालील क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा मध्यप्रदेशनंतर दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी या पिकाखाली एकूण 48 ते 50 लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातही 17-18 लाख हेक्टर क्षेत्रासह विदर्भ आघाडीवर आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राने आतापर्यंत 6 वाण प्रसारित केले आहेत. अवर्षण काळात किंवा जास्त पर्जन्यमानामध्येही या वाणांनी चांगले उत्पादन दिल्यामुळे हे वाण अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. यातील दोन सोयाबीन वाणांबाबत (Soybean Variety) आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे आहेत दोन सोयाबीन वाण (Soybean Variety For Farmers)
1. पीडीकेव्ही अंबा (एएमएस 100-39) : हे सोयाबीन वाण (Soybean Variety) लवकर परिपक्व होणारे, जास्त उत्पादन क्षमता असलेले, तीन दाण्यांच्या शेंगांचे प्रमाण व दाण्यांचे वजन इतर वाणांपेक्षा जास्त आहे. बियांमध्ये तेल व प्रथिनांचे प्रमाणही इतर वाणांपेक्षा जास्त आहे. बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या या वाणाने शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिकांमध्ये प्रचलित वाणांपेक्षा 27 टक्के जास्त उत्पादकता नोंदविली आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्याकरिता या वाणाची शिफारस करण्यात आली आहे.
सोयाबीनचे हे वाण 28-30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन क्षमता असलेले वाण आहे. तसेच हे सोयाबीन वाण 94-96 दिवसांमध्ये परिपक्व होणारे वाण आहे. मूळकुज/खोडकुज या रोगास व चक्रभुंगा आणि खोडमाशी या किडीस मध्यम प्रतिकारक आहे. या वाणात प्रचलित वाणांपेक्षा तेलाचे व प्रथिनाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त आहे. परिपक्वतेनंतर 10-12 दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे.
2. पीडीकेव्ही येलोगोल्ड (एएमएस 1001) : मध्यम कालावधीत येणारे हे वाण निश्चित ते मध्यम पर्जन्यमानाच्या भागात उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास प्रचलित वाणांपेक्षा हमखास जास्त उत्पादन देते. विशेष करून बुलढाणा, वाशीम व अकोला जिल्ह्यांमध्ये या वाणाला चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर प्रथम रेषीय प्रात्याक्षिकामध्ये सदर वाणाने प्रचलित वाणांपेक्षा २० टक्के जास्त उत्पादकता नोंदवली आहे. या वाणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.
या सोयाबीन वाणाच्या फुलाचा रंग जांभळा, खोड व शेंगावर लव नाही. तसेच या सोयाबीन वाणाच्या परिपक्वतेचा कालावधी 95 ते 100 दिवस इतका आहे. या वाणाची सरासरी उत्पादकता 22-26 क्विंटल/हेक्टर इतकी आहे. हे सोयाबीन वाण मूळकुज/खोडकुज व पिवळा मोझॅक या रोगांस मध्यम प्रतिकारक आहे. याशिवाय चक्रभुंगा व खोडमाशी या किडीस देखील मध्यम प्रतिकारक आहे. या वाणाच्या सोयाबीनच्या परिपक्वतेनंतर 10 दिवसांपर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे.