Success Story : एक एकरात व्हीएनआर पेरूची लागवड; शेतकऱ्याची वार्षिक 7 लाखांची कमाई!

Success Story Of Guava Farming
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील प्रगतशील शेतकरी (Success Story) प्रशांत शिंदे यांनी व्हीएनआर जातीच्या पेरूचे एक एकरातून वर्षात सुमारे सात लाखापर्यंत विक्रमी उत्पादन घेतले आहे. विक्रीसाठी मुंबई, पुण्याला पाठविण्यापेक्षा शिंदे यांनी स्वतःच पेरुची विक्री केल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन, त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळाले आहे. शिंदे यांची शेती आणि त्यांचे कौशल्य अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श असेच आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

व्हीएनआर जातीची निवड (Success Story Of Guava Farming)

शेतकरी प्रशांत शिंदे यांची आष्टा ते इस्लामपूर रस्त्याशेजारी 10 एकर शेती आहे. त्यांनी दहा एकर ऊस लागवड करून बारमाही शेती करण्यापेक्षा, त्यांनी शेतीमध्ये विविधता आणली. 10 एकर जमिनीपैकी दोन एकर ऊस, साडेचार एकर केळी आणि एक एकर क्षेत्रात पेरुची लागवड केली आहे. प्रशांत शिंदे यांनी जून 2018 मध्ये शेतीची उभी आडवी नांगरट करून शेणखत घालून पेरू लागणीसाठी जमीन तयार केली. त्यानंतर छत्तीसगड राज्यातील रायपूर येथून व्हीएनआर जातीची रोपे आणली. 180 रुपयाला एक याप्रमाणे 12 बाय 8 फुटावर सुमारे 450 रोपांची लागवड केली आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शिंदे यांच्या या झाडांची उंची सुमारे तीन फूट झाल्यानंतर, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बागेची तीन टप्प्यात छाटणी केली. छाटणीनंतर सात महिन्यांनी पेरूचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या वर्षी सुमारे एक लाख लाखाचे उत्पादन मिळाले. दररोज सुमारे 60 ते 70 किलो पेरू शिंदे कुटुंबीय स्वतः विक्री करत असल्याने त्यांना वर्षाला सात लाख रुपये उत्पादन मिळते. यातील दोन लाख रुपये कामगार, खते व इतर खर्च वजा करता सुमारे पाच लाखापर्यंत नफा मिळत असल्याचे ते सांगतात.

पेरूची थेट पद्धतीने विक्री

पेरूवरती मिलीबग्ज, फुल किडे आणि मावा व बुरशीजन्य रोगासाठी कीटकनाशके व बुरशीनाशके फवारण्यात येत आहेत. पेरु लिंबाच्या आकाराएवढा झाल्यानंतर त्याला फोम, प्लास्टिक कागद व वर्तमानपत्राचा कागद लावल्याने अळीपासून संरक्षण मिळते. पेरू चवीला गोड असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे. स्वतः विक्री केल्याने नफा मिळतोय. असे शेतकरी प्रशांत शिंदे यांनी सांगितले आहे.