Unseasonal Rain : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले; रस्त्यांवर जागोजागी पाणीच पाणी!

Unseasonal Rain In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) वर्तवलेला अंदाज (Unseasonal Rain) अगदी तंतोतंत खरा ठरला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज (ता.10) अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यात प्रामुख्याने आज पुण्यात भर पावसाळ्यासारखा धुवाँधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पुण्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आज जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान देखील झाले आहे. पुण्यामध्ये तर अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर (Unseasonal Rain) जागोजागी पाणी साचलेले पाहायला मिळाले आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये बरसला पाऊस (Unseasonal Rain In Maharashtra)

पुणे : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) सुरु आहे. लोहगाव, भवानी पेठ आणि शहरातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत असल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. याशिवाय जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे काही भागात रस्त्यावर पाणी साचल्याने पाहायला मिळाले. तर ग्रामीण भागात जिल्ह्याच्या पूर्व भागासह सिन्नर अभोणा या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे उन्हाळी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस रौद्ररूप धारण केले असून, आज दुपारच्या सुमारास जिल्हयात अनेक भागांमध्ये अर्धा तासाहुन अधिक वेळ मुसळधार पाऊस सुरू असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत, असल्यामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली होती.

सांगली : सांगली जिल्ह्यातही आज अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात गारपिटीसह पाऊस पडला आहे. त्या ठिकाणी विजेच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला आहे. गारपिटीमुळे या परिसरातील भाजीपाल्यासह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने कन्नड, पिशोर, खुलताबाद, वेरूळ, चित्तेपिंपळगाव, काद्राबाद आणि फुलंब्री परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला आहे. फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.