हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मागील दोन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, पश्चिम भागात, तसेच कोकणामधील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसताना दिसत आहे. तर विदर्भ, मराठवाडा मध्ये तापमानाचा पारा हा वाढतो आहे. पुढचे चार दिवसांमध्ये राज्यात तीव्र हवामान सक्रिय राहणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, लगतच्या मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह, वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे. तर दोन-तीन दिवसांनंतर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याबाबतची माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
इतर राज्यातील हवामान
इतर राज्यांचा विचार करीता येत्या पाच दिवसांमध्ये गुजरात राज्यात उष्णतेची लाट असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर दिनांक 24 ते 26 दरम्यान बिहार मध्ये उष्णतेची लाट असेल दिनांक 25 ते 28 दरम्यान मध्य महाराष्ट्र झारखंड आणि ओरिसामध्ये तर दिनांक 26 ते 28 दरम्यान राजस्थान दक्षिण उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि विदर्भात तर 27 28 एप्रिल रोजी पंजाब आणि दक्षिण हरियाणामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर दिनांक 24 ते 26 एप्रिल दरम्यान अरुणाचल प्रदेश मध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर आसाम, मेघालया मध्ये 24 आणि 27 एप्रिल च्या दरम्यान तसंच 28 एप्रिल रोजी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
कुठे किती तापमान?
विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तापमानाने 45 अंशांपर्यंत उसळी मारली होती ते आता काहीसे कमी झाले आहे. दिनांक चोवीस एप्रिल रोजी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार अकोला इथं कमाल 42 अंश सेल्सिअस, अमरावती 42 अंश सेल्सिअस, बुलढाणा 39.3, ब्रह्मपुरी 41, नागपूर बेचाळीस पॉईंट दोन, आणि गोंदिया 42 पॉईंट दोन, यवतमाळ 42.5 असे कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. तापमानात काहीअंशी घट झाल्यामुळे तीव्र उन्हाने भाजून निघालेल्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागाला थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान इतर भागातील तापमान पाहता पुणे 37.1, लोहगाव 36.9, कोल्हापूर 33.5, महाबळेश्वर 25.81, नाशिक 38.9, सांगली 31.5, सातारा 36.8, सोलापूर 34.36, मुंबई 34 ,सांताक्रुज 35.5 ,रत्नागिरी 34.5, पणजी 32 पॉईंट सात, डहाणू -36.8, औरंगाबाद 37.2 परभणी 38.2 नांदेड 42.6 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
येत्या 4 दिवसाचा यलो अलर्ट
25एप्रिल – आज दिनांक 25 रोजी राज्यातील अहमदनगर, पुणे ,सातारा, सांगली ,कोल्हापूर ,रत्नागिरी ,रायगड, उस्मानाबाद आणि लातूर या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर जळगावात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.
26एप्रिल – उद्या दिनांक 26 एप्रिल रोजी अहमदनगर, जळगाव ,बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा ,सांगली ,कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हवामान खात्याने इथं पावसासाठी यलो अलर्ट दिला आहेत.
27एप्रिल – दिनांक 27 एप्रिल रोजी यवतमाळ, अहमदनगर, जळगाव ,बुलढाणा ,अकोला ,चंद्रपूर, गडचिरोली या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर ,सातारा ,सांगली ,कोल्हापूर, परभणी या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
28एप्रिल – दिनांक 28 एप्रिल रोजी अहमदनगर, जळगाव, बुलढाणा ,अकोला ,यवतमाळ ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर सोलापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.